पुणे : पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील ९३ शिक्षण सेवकांची यंदाची दिवाळी गोड होणार असून, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांचे मानधन सहा हजारावरुन १६ हजार करण्यात आला आहे. यासंदर्भातील परिपत्रक महापालिकेने काढले आहे. ऐन दिवाळीच्या मोक्यावर मानधन वाढीचे परिपत्रक काढण्यात आल्याने शिक्षण सेवकांनी आनंद व्यक्त केला असून मंत्री श्री. पाटील यांचे आभार मानले आहेत.
पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत गेली १४ वर्षे मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षणसेवकांना उच्च न्यायालयाने शिक्षण सेवेत कायम करुन वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश फेब्रुवारी २०२३ मध्ये दिले होते. यासाठी न्यायालयाने सहा आठवड्यांची मुदत दिली होती. मात्र, महापालिकेच्या शिक्षण विभागाने या आदेशावर कार्यवाही केलेली नव्हती.त्यामुळे सर्व शिक्षण सेवकांनी जून २०२३ मध्ये आंदोलनाचा पवित्रा घेत महापालिकेच्या विरोधात निदर्शने केली होती.
यावेळी जिल्ह्याचे तत्कालिन पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करुन शिक्षण सेवकांना न्याय देण्याचे आश्वस्त केले होते. त्यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा करुन तत्काळ सर्व ९३ शिक्षण सेवकांना कायम करुन वेतन श्रेणी लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार, महापालिकेने फेब्रुवारी २०२३ च्या शासन आदेशानुसार सर्व ९३ शिक्षण सेवकांना सहा हजारावरुन १६ हजार मानधन करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबतचे परिपत्रक आज जारी करण्यात आले. परिपत्रकाद्वारे वित्त विभागाला तातडीने वेतन आदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व शिक्षणसेवकांनी आनंद व्यक्त केला असून, मंत्री श्री. पाटील यांना धन्यवाद दिले आहेत.