मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण न टिकण्यासाठी ठाकरेच जबाबदार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव हाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहेत, हे त्यांनाही माहित आहे आणि मराठा समाजालाही…! असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का ? असा संतप्त सवाल सरकारला केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. राज्यात अनेक ठिकाणी हे आंदोलन अधिक आक्रमक होते आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील आता उपस्थित झाला आहे.
‘आम्ही करु शकलो नाही, पण हे करत आहेत म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मराठा आरक्षणावर बोलण्याचा ठाकरेंना नैतिक अधिकार नाही. ज्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. उच्च न्यायालयामध्ये त्या आरक्षणाला चॅलेंज देण्यात आलं, तिथेही ते आरक्षण टिकलं. ते टिकवण्याचं काम मी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालायमध्ये ते टिकलं नाही. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते टिकवलं नाही’, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.