जर आपणही लोन रिकव्हरी एजन्ट्सच्या त्रासाला सामोरे जात असाल, तर आपल्यासाठी दिलासादायक बातमी आहे. जेव्हा एखादी सामान्य व्यक्ती बँकेकडून अथवा एखाद्या संस्थेकडून लोन घेते, तेव्हा ते त्या व्यक्तीसाठीच डोकेदुखी बनते. मात्र, जेव्हा एखादी श्रीमंत व्यक्ती बँकेकडून लोन घेते, तेव्हा ते त्या बँकेसाठी डोके दुखीचे कारण बनते. जर सामान्य व्यक्तीला बँकेचे लोन चुकवता आले नाही, तर संबंधित संस्थांकडून अशा व्यक्तींना धमकावण्यात आल्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत.
आता भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एक खास प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यानंतर रिकव्हरी एजेन्ट्स आपल्याला सायंकाळी 7 वाजेनंतर, फोन करू शकणार नाही. आरबीआयच्या प्रस्तावानुसार वित्तीय संस्था आणि त्यांचे वसुली एजन्ट्स कर्जदारांना सकाळी 8 वाजण्यापूर्वी आणि सायंकाळी 7 नंतर कॉल करू शकणार नाही.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आरबीआयच्या जोखीम व्यवस्थापन आणि आचारसंहितेवरील मसुदा निर्देशात म्हण्यात आले आहे की, बँका आणि एनबीएफसी सारख्या रेग्युलेटेड एंटिटीजने मुख्य व्यवस्थापन कार्ये आउटसोर्स करायला नकोत. या कामांमध्ये धोरण तयार करणे आणि KYC मानदंडांच्या पालनाचे निर्धारण, तसेच कर्ज मंजूरीचाही समावेश आहे.