मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. ‘माझी माती, माझा देश’ कलश यात्रेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले कि, “भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारला जाणार आहे. आम्ही हा पुतळा तिथे पाठवलाय. लवकरच तो कार्यक्रम होईल. पाकिस्तानला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची भीती वाटेल, ते गर्भगळीत होतील” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“प्रत्येक गावा-गावातून, घरातून नागरिक ‘माझी माती, माझा देश’ कार्यक्रमाशी जोडलेले आहेत. आज विशेष ट्रेन इथून दिल्लीला रवाना होईल, तिथे हे सारे कलश एकत्र होतील” असं मुख्यमंत्री म्हणाले. लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यात येणार आहेत, त्या बद्दलच्या प्रश्नालाही एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. “आमचे मंत्री सुधारी मुनगंटीवार स्वत: लंडनला गेले. जी वाघनखं आहेत, त्याला इतिहास आहे आणि ती वाघनखं आपल्या देशात, राज्यात, महाराष्ट्रात आणणं प्रत्येक देशवासियासाठी गौरवास्पद अभिमानास्पद आहे, प्रत्येकाल हेवा वाटावं असं हे देशाभिमानी काम आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“काही लोक या सरकारच्या प्रत्येक कामाबद्दल विरोध, द्वेष, मत्सर व्यक्त करतात. त्यांनी यावर आक्षेप घेतलाय. शंका व्यक्त करण हे दुर्देव आहे. शंका व्यक्त करणाऱ्या या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सोडून अफजल खानाचा आदर्श स्वीकारलेला दिसतोय” अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. “सांस्कृतिक विभाग आपल काम करेल. वाघनखं परत आणली जातील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली प्रत्येक वस्तू आम्ही आणण्याचा प्रयत्न करु” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.