मनोरंजन : तुम्हाला जर चित्रपट पाहण्याची प्रचंड आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या 13 ऑक्टोबर रोजी मल्टिप्लेक्स असोसिएशनकडून राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये ही ऑफर देण्यात येणार आहे. या दिवशी तुम्हाला कोणताही सिनेमा फक्त 99 रूपयांत पाहता येणार आहे.
मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि संपूर्ण भारतातील चित्रपटगृहांनी एकत्र येऊन चित्रपट रसिकांसाठी एक अविस्मरणीय चित्रपट मॅरेथॉन तयार केली आहे. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाच्या भव्य यशाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी देखील राष्ट्रीय चित्रपट दिन 4000 हून अधिक स्क्रीनवर साजरा केला जाणार आहे. गेल्या वर्षी एकाच दिवसात सर्वाधिक 6.5 दशलक्ष लोकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला होता.गेल्या वर्षी 75 रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.










