नवी दिल्ली : धनगर आरक्षण या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी पत्रव्यवहार करून धनगर आरक्षणाबाबत मागणी केली आहे. परंतु त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र पत्र पाठवले नाही
दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता जहरी टीका केली आहे. पत्रकारांशी बोलत असताना ते म्हणाले की, लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू आहे. दरम्यान या वाक्यावरून पडळकर चांगलेच चर्चेत आले असून राष्ट्रवादी देखील त्यांच्या या वक्तव्यांचा कडाडून निषेध करत आहेत.
पडळकर म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री अजित पवारांना मानत नाही, आपण त्यांना सिरियसली घेत नसल्याचं त्यांनी म्हटल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. त्या म्हणाल्या की यासाठीच भाजपने अजित पवारांना सोबत घेतलं का ? हा अजित पवारांचा मोठा अपमान आहे. विशेष म्हणजे ते भाजपसोबत सत्तेत असतानाही त्यांचा मित्र पक्ष त्यांच्याबद्दल असं बोलतो भाजपने याचे उत्तर द्यायला हवे. असा सवाल सुप्रिया सुळे यांनी भाजपला विचारला आहे.