मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या डेक्कन क्वीनचा (Deccan Queen) ९४ वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. पुणे स्थानकात केक कापून, तुतारी वाजवत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
१ जून १९३० रोजी ब्रिटीश सरकारच्या काळात डेक्कन क्वीन सुरु झाली होती. त्याकाळी या गाडीचा उपयोग घोड्याच्या शर्यतींचे शौकीन असलेल्यांकडून मुंबई-पुण्याला जाण्यासाठी केला जायचा.
मुंबई-पुणे या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारी ही पहिली डिलक्स ट्रेन होती. सुरुवातीला ही गाडी ७ डबे असलेल्या २ रेकसह चालवण्यात आली होती. मुळ डब्यांच्या अंडर फ्रेम्सची बांधणी लंडनमध्ये करण्यात आली होती. तर रेल्वे कोचची बॉडी माटुंगा येथील रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये तयार केली गेली होती.
सुरुवातीच्या काळात डेक्कन क्वीन केवळ शनिवार आणि रविवार धावत असे. नंतरच्या काळात ही गाडी रोज धावू लागली रोज मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा आधार बनली. मुंबई-पुण्यादरम्यान कामाच्या निमित्ताने रोज प्रवास करणाऱ्यांच्या जिवनाचा अविभाज्य भाग ही गाडी बनलेली दिसते.
डेक्कन क्वीनचा पहिला प्रवास खरंतर कल्याण ते पुणे असा झाला होता. पण विशेष म्हणजे या गाडीला कल्याण थांबा आता नाहीये. नंतरच्या काळात ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पुणे स्टेशन अशी धावायला लागली.
या ट्रेनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील डायनिंग कार. या डब्यामध्ये एखाद्या हॉटेलप्रमाणे टेबल आणि खुर्च्यांची व्यवस्था केलेली असते. प्रवासादरम्यान या डायनिंग कारमध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी ही खास सोय केलेली दिसते.
डेक्कन क्वीनच्या नावावरील विक्रम (Deccan Queen Records)
- डेक्कन क्वीन ही भारतातील पहिली सुपरफास्ट ट्रेन होती.
- इलेक्ट्रिक इंजिनवर धावणारी भारतातील पहिली प्रवासी ट्रेन होती.
- महिलांसाठी विशेष डबा असणारी डेक्कन क्वीन भारतातील पहिली ट्रेन होती.
- डायनिंग कार डबा असणारी देखील भारतातील पहिली ट्रेन डेक्कन क्वीन होती.
सध्या या गाडीला विस्टाडोम कोच देखील जोडण्यात आला आहे. या गाडीत एक विस्टाडोम कोच, ४ एसी चेअर कार, ९ द्वितीय श्रेणी चेअर कार तसेच गार्ड ब्रेक व्हॅन, पॅन्ट्री कार यांचा समावेश आहे.