Oppenheimer & Nehru : २१ जुलै ते २२ जुलै दरम्यान संपूर्ण भारतात प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट ओपेनहायमरमुळे आता इतिसातील अनेक नवं नवीन पैलू समोर येत आहेत. हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाल्यापासूनच ओपेनहायमर आणि भारताचा संबंध या विषयीही अनेक चर्चा सुरु आहेत. मग ते ओपेनहायमर आणि संस्कृत असो किंवा ओपेनहायमर आणि भगवद्गीता. पण अणुबॉम्बचे जनक असलेल्या याच ओपेनहायमर यांनी एकेकाळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना पत्र लिहिल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. ओपेनहायमर आणि नेहरु यांचा इतिहासात कसा संबंध आला आणि नेमका पत्रव्यवहार कशासाठी होता हेच या लेखात आपण जाणुन घेणार आहोत.
ओपेनहायमर कोण होते?ओपेनहाइमर आणि भगवद्गीता सबंध, पहिली अणुबॉम्ब चाचणी आदी विषयावर महाटॉक्सचा खास लेख या पूर्वीच प्रकाशित झालेला आहे. त्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करून लेख वाचू शकता.
अणुबॉम्बचा जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर यांनी अणुबॉम्बचा शोध लावला आणि जगातील पहिली अणुबॉम्ब चाचणी केली. दुसरं महायुद्ध थांबवण्यासाठी जेव्हा अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर ओपेनहायमर यांनी बनवलेला अणुबॉम्ब हल्ला केला तेव्हा हिरोशिमा आणि नागासाकीचा विध्वंस पाहून ओपेनहायमर हादरले होते. आपल्या हाताला निष्पाप लोकांचं रक्त असल्याचं त्यांना खंत वाटू लागली होती. नंतर ते अणुबॉम्बचा वापर करण्याच्या विरोधात गेले होते. नंतरच्या काळात अमेरिकन सरकारने हायड्रोजन बॉम्ब बनविण्यातही ओपेनहायमर यांनी पुढाकार घ्यावा असं सुचवल्यावर ओपेनहाइमर यांनी याला साफ नकार दिला.
ओपेनहायमर आणि भारताचा सबंध
लेखक बख्तियार के. दादाभॉय यांनी भारताचे शास्त्रज्ञ ‘होमी जहांगीर भाभा’ यांच्या जीवनावर आधारित ७२३ पानांचे पुस्तक एप्रिल २०२३ मध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात बख्तियार यांनी भाभा आणि ओपेनहायमर यांच्या मैत्रीबद्दल लिहिलं आहे. तसेच भाभा आणि नेहरू यांच्यातले दृढ संबंध बद्दलही लिहिलं आहे. आणि या दोन संबंधामुळे ओपेनहायमर आणि नेहरूंचा कसा सबंध आला होता. हे देखील त्यांनी स्पष्ट केलेल आहे. लेखक बख्तियार त्यांच्या ‘Homi J. Bhabha: A Life’ या पुस्तकात लिहितात की, ” दुसरं महायुद्ध संपल्या नंतर ओपेनहायमर आणि होमी भाभा यांची भेट झाली. हे दोन्ही शास्त्रज्ञ संस्कृती जपणारे, भगवद्गीतेवर आस्था ठेवणारे, संस्कृतच ज्ञान असणारे आणि त्यांच्यात बरच साम्य असल्यामुळे त्यांची लवकरच चांगली मैत्री झाली.”
नेहरूंची भाची लेखिका नयनतारा सहगल यांनी त्यांच्या “नेहरू: सिव्हिलायझिंग अ सेव्हेज वर्ल्ड” या पुस्तकात ओपेनहायमर आणि नेहरू यांच्यातील पत्रव्यवहारावर प्रकाश टाकला आहे. या पुस्तकात त्यांनी ओपेनहायमर यांनी पाठवलेल्या ‘टॉप सिक्रेट’ संदेशाचा उल्लेख केला आहे. त्यांनी यात लिहिलं आहे की, अणुबॉम्बपेक्षाही घातक शस्त्र बनवण्याच्या अमेरिकन सरकारच्या प्रयत्नांबद्दल ओपेनहायमर यांनी नेहरूंशी संपर्क साधला होता. ओपेनहायमरने नेहरूंना विनंती केली होती की, भारताने थोरियमचा पुरवठा अमेरिकेला करु नये.
नेहरूंच्या बहिणीच्या पत्रात ओपेनहायमरचा उल्लेख
नेहरुंची बहिण विजयालक्ष्मी पंडित यांनी २१ फेब्रुवारी १९५१ रोजी नेहरूंना लिहिलेल्या पत्राचा हवाला देऊन सहगल लिहितात, “अणुबॉम्बवर अत्यंत भयानक आणि प्राणघातक काम केले जात आहे. अमेरिका जाणूनबुजून विनाशाच्या युद्धाकडे वाटचाल करत आहे. हे तुम्हाला कळावे अशी ओपनहायमर यांची इच्छा आहे. (हॅरी) ट्रुमनने अलीकडे दिलेली आश्वासने अणूच्या संदर्भात असून त्यापेक्षाही प्राणघातक गुणवत्तेच्या शस्त्रासाठी संशोधन केले जात आहे. जे अत्यंत गुप्त ठेवले जाईल आणि अणूऐवजी वापरले जाईल. हे संशोधन अत्यंत वेगाने चालू आहे.”
ओपेनहाइमरने नेहरूंना लिहिले पत्र (Oppenheimer letter to Nehru)
सहगल लिहीतात की, “ओपेनहायमरने नेहरूंना लिहिले पत्र भारताचे राजदूत, अमिया चक्रवर्ती यांच्यामार्फत भारतात आलं. या पत्रात, शास्त्रज्ञाने अमेरिकेच्या त्यांच्या प्रकल्पासाठी भारताच्या मुबलक थोरियमच्या गरजेवर भर दिला. त्यांनी उत्कटतेने विनंती केली की भारत सरकारने थोरियमचा पुरवठा स्वेच्छेने किंवा कोणत्याही दबावाखाली करणे टाळावे. ओपेनहायमर भारत सरकारला विनंती करतात की यूएसला कोणतेही थोरियम स्वेच्छेने किंवा दबावाने विकू नये. जर भारतातील थोरियमची अफाट संसाधने अमेरिकेच्या ताब्यात ठेवली तर आतापर्यंतचे सर्वात मोठे विश्व युद्ध होऊ शकते.”
नेहरू शांत संयमी व्यक्तीमत्वाचे असून त्यांना अण्वस्त्रांचा तीव्र तिरस्कार होता आणि अलिप्तता स्वीकारून अगोदरच त्यांनी युद्ध नाकारले होते. त्यांना जेव्हा ओपेनहायमरच्या सूचना मिळाल्या त्यांनी लगेच त्यांचं पालन केले आणि अमेरिकेची ऑफर नाकारली.
ओपेनहायमरला भारताचे नागरिकत्व
ओपेनहायमर यांना भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय शास्त्रज्ञ होमी भाभा यांच्या आग्रहावरून भारतीय नागरिकत्व देऊ केले होते, असे लेखक बख्तियार त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे.
“१९५४ मध्ये जेव्हा ओपेनहायमरने त्याची सुरक्षा मंजुरी गमावली तेव्हा भाभा यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांना जवाहरलाल नेहरूंनी एकापेक्षा जास्त प्रसंगी भारताला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. तसेच त्यांची इच्छा असल्यास त्यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारावं. भारतात पूर्ण आदराने त्यांचं स्वागत करण्यात येईल, असं नेहरूंनी ओपेनहायमर यांना पत्र लिहून सांगितले होते.” असं दादाभॉय यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलेलं आहे.
ओपेनहाइमर यांनी भारतीय नागरिकत्व नाकारलं
ओपेनहायमर यांनी तत्कालीन भारतीय प्रधानमंत्री पंडित नेहरूंनी देऊ केलेलं भारतीय नागरिकत्व नाकारलं. जोपर्यंत आपल्यावरील सर्व आरोपांपासून मुक्त होत नाही, तोपर्यंत अमेरिका सोडणे योग्य नाही, असं ओपेनहायमर यांना वाटत होतं. तसेचं त्यांचं भारतात जाणंही अमेरिकेला आवडलं नसतं. त्यामुळे ओपेनहायमर यांनी भारतीय नागरिकत्व स्विकारलं नाही, असं बोललं जातं.