पुणे : पुण्यामध्ये नेमकं सध्या काय सुरू आहे असा प्रश्न आता पुणेकरांनाच पडलाय. कारण पुण्यामध्ये सध्या वाढती गुन्हेगारी, अपघात, ट्रॅफिक जाम हेच अधिक वाढले असून शिक्षणाच्या माहेरघरात वातावरण प्रचंड ढवळले गेले आहे. औंधसारख्या परिसरामध्ये दारू पिण्यासाठी 77 वर्षे वृद्धावर लोखंडी रॉडन हल्ला करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, औंध सारख्या भागातून मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर चार दारुड्यांनी हल्ला केला. हे दारुडे रात्रभर दारू पीत या परिसरात बसले होते. या घटनेमध्ये समीर रॉय चौधरी वय वर्ष 77 हे सकाळी पाचच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना त्यांच्यावर दारू पिण्यासाठी पैसे मागण्याच्या हेतून या चौघा जणांनी त्यांच्याकडे बाचाबाची करायला सुरुवात केली. दरम्यान चौधरी यांच्याकडे यावेळी पैसे नव्हते. याचा राग या चौघा जणांना आला आणि थेट चौधरी यांच्या डोक्यामध्ये या चौघांनी लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये चौधरी यांचा शुक्रवारी मृत्यू झाला.
या घटनेने आता पुणे परिसरामध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचे दिंडवडे कसे निघाले आहेत याबाबतच चर्चा सुरू आहे. रात्रभर हे चार दारुडे दारू पीत या परिसरात बसले होते. धक्कादायक म्हणजे यापैकी तिघेजण अल्पवयीन असून दोघाजणांवर हत्या सारखा गंभीर गुन्हा देखील दाखल आहे. पुणेकरांमध्ये आता घराबाहेर पडण्यासाठी देखील दहशत निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.