मुंबई : काल 20 मेला मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रिये दरम्यान मोठी घटना घडली आहे. शिवसेनेचे पोलिंग एजंट म्हणून काम करत असणारे मनोहर नलगे यांचा मृत्यू झाला आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना सार्वजनिक शौचालयाकडे ते गेले असता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर नलगे हे शिवसैनिक पोलिंग एजंट म्हणून काम करत होते. दिवसभर मतदान केंद्रात ते उपस्थित होते. मतदान संपण्याच्या काही वेळ आधी ते शौचालयाकडे गेले असता त्या ठिकाणी ते बेशुद्ध अवस्थेत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी केइम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान याबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, ” इतकी घाणेरडी व्यवस्था माझ्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत मी कधीच पाहिली नाही. जेवढी यावेळी निवडणूक आयोगाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केली. वरळीतील एका शिवसैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा मृत्यू म्हणजे निवडणूक आयोगाच्या गैरव्यवस्थेचा बळी आहे.” असा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे.