नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीबाबत ट्विस्ट कमी होण्याचं नाव घेत नाहीये. येत्या 20 मे रोजी नाशिकची लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर आजपासून नाव निर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आज शांतिगिरी महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महायुतीतून अद्याप देखील एकीकडे जागावाटप आणि उमेदवारी बाबतचा तिढा सुटलेला नाही. अशातच छगन भुजबळ यांनी माघार घेतली. यानंतर हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असे वाटत असतानाच आता कोकाटे यांच्या नावाच्या चर्चेला उधाण आल आहे. शांतिगिरी महाराज हे महायुतीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतु नाशिकची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता महायुतीने त्यांच्या नावाचा फारसा गंभीर्याने विचार केला नाही.
यानंतर आता आज शांतिगिरी महाराज यांनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याचे ठरवले आणि पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान शांतिगिरी महाराजांनी अपक्ष निवडणूक लढवणे हे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नक्कीच फटका देऊ शकते.
शांतिगिरी महाराज यांची सात लोकसभा मतदारसंघात चांगली ख्याती आहे. तसेच त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. जळगाव, धुळे, सटाणा, मालेगाव, निफाड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर या शहरामध्ये देखील त्यांचे अनेक भक्त आहेत. महाराष्ट्रातील अनेक कुटुंब त्यांना मानतात. तर या लोकसभा मतदारसंघातील सुमारे चार लाख मतदान शांतिगिरी महाराजांच्या बाजूने होणार अशी दाट शक्यता आहे. एकंदरीतच शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीने ही निवडणूक आता जोखमीची होणार आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये धक्कादायक घटना; तरुण मतदाराने मतदान करण्याऐवजी EVM मशीनवर घातले कुऱ्हाडीचे घाव