सातारा : साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचे समर्थक शिवतीर्थावर जमले आहेत. भाजपने अद्याप साताऱ्याची उमेदवारी जाहीर न केल्यामुळे उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये धुसफुस पाहायला मिळते आहे.
यावेळी शिवतीर्थावर जमून समर्थकांनी उदयनराजेंच्या नावाने घोषणा दिल्या आहेत. तसेच राजेंनी स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी देखील समर्थक करत असल्याचा समजते आहे.
भाजपने नुकतीच आपली लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचं नाव नव्हतं. पण दुसऱ्या यादीमध्ये सर्वात जास्त अर्थात वीस उमेदवारांची नावे या यादीमध्ये आहेत. परंतु या यादीमध्ये साताऱ्याच्या उमेदवारी बाबत काहीही घोषित करण्यात आले नाही. अर्थात सातारा हा उदयनराजे भोसले यांचा बालेकिल्ला आहे. आणि असं असताना भाजपने उमेदवारी अद्याप घोषित न केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस आहे. त्यामुळेच उदयनराजेंनी आता ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. यावर आता भाजप काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.