पुणे : पुणे शहरामध्ये एका अफवेमुळे प्रचंड तणाव निर्माण झालाय. ही अफवा आहे पुण्यातील भर कसबा पेठ येथील सलाउद्दीन दर्ग्यावर अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार असल्याची… परंतु ही केवळ अफवा असून नागरिकांनी विश्वास ठेवू नये असा आवाहन पुणे पोलीस आयुक्तांनी केले आहे. तरीही या भागामध्ये प्रचंड तणाव पाहायला मिळतो आहे.
नेमकं काय घडलं
शुक्रवारी रात्री कोणीतरी ही अफवा पसरवली की कसबापेठेत असणाऱ्या सलाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार आहे. ही अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि त्यामुळे या दर्ग्याजवळ मोठ्या संख्येने मुस्लिम समाज जमा झाला आहे. या परिसरामध्ये अचानक मुस्लिम समाज जमा झाल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी सर्व पोलिसांच्या रजा देखील रद्द केल्या आणि या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर या दर्जावर कोणतीही कारवाई होणार नाही. कोणीतरी खोडसाळपणे ही पसरवलेली केवळ अफवा असल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केल आहे.
दरम्यान पुणे पोलीस आयुक्त काही वेळात मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेणार आहेत. ही अफवा नेमकी कोणी पसरवली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा जमाव एवढ्या कमी वेळात इथे कसा जमा झाला याचा देखील तपास होणार आहे. दरम्यान अमितेश कुमार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की कसबा पेठ येथील शेख सल्ला दर्गामध्ये कोणत्याही अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई होणार नाही. ही अफवा आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगून पोलीस आयुक्तांनी शांततेच आवाहन केलं आहे.