पुणे : पुण्यात भाजपतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यात भाजपने महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यात आता लोकसभा निवडणुकीच्या शर्यतीत असलेले मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिकेत पोस्टरबाजी केली आहे.
नेमकं पोस्टरवर काय लिहिले

” स्टॅंडिंग दिली, महापौर दिलं, सरचिटणीस बनवलं, खासदारकी पण देणार ? आता बस झालं ! तुला नक्की पाडणार ! कष्टाळू भाजप कार्यकर्ते…
अशा आशयाचं हे बॅनर आहे जे थेट पुणे महानगरपालिकेत लावण्यात आले आहे. या बॅनरबाजीमुळे एकंदरीतच पुण्यातील भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रमुख नेते हे दिल्लीमध्ये आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जागा वाटपाबाबत महत्त्वाची चर्चा केली आहे. यानंतर जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय हा दिल्लीतच होणार हे स्पष्ट झालं होतं. दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे काही प्रमुख नेते हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल अशी अपेक्षा असतानाच पुण्यामध्ये थेट अशी बॅनरबाजी आता करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीच्या या शर्यतीमध्ये माजी खासदार संजय काकडे आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची जोरदार घोडदौड सुरू आहे. अशातच भाजपच्याच कार्यकर्त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना अशी बॅनरबाजी करून खोचक प्रश्न केला आहे.
यावर ” निवडणुकीपूर्वी शहरातील वातावरण दूषित करण्याचा हा प्रकार असल्याचा संजय काकडे यांनी म्हटले आहे. अशा पद्धतीचे बॅनर लावल्यामुळे उमेदवारी देण्याबाबत निर्णयात फरक पडत नसतो. हा प्रकार बालिशपणाचा आहे. ” अशी प्रतिक्रिया संजय काकडे यांनी दिली आहे. यावर आता भाजपचे इतर प्रमुख नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे लोकसभासाठीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळते याकडे देखील आता पुणेकरांचे लक्ष लागल आहे.