मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण केले. त्यांनी आपले उपोषण थांबवावे यासाठी आजपर्यंत राज्य सरकारच शिष्टमंडळ, अनेक वरिष्ठ मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अंतर्वली सराटीमध्ये जाऊन त्यांचे उपोषण थांबवले होते. परंतु आपल्या मागणीवर जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत जरांगे पाटील यांनी सातत्याने उपोषण करण्याचे सुरू ठेवले. तर मुंबईमध्ये देखील मोठे आंदोलन छेडण्यात आले होते.
दरम्यान 10 फेब्रुवारीला त्यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण काल मागे घेतल आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वापरलेले अपशब्द त्यांना अडचणीत आणणार अशी चिन्ह आता दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर आता राज्य सरकार चांगलेच आक्रमक झाले आहेत. काल जरांगे पाटील यांच्यावर अमळनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आज थेट त्यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात यावी असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.
कालपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी जरांगे पाटलांच्या या आंदोलनावर आणि त्यांच्या कृतींवर आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा केली आपण महाराष्ट्राच्या हिताची चिंता करणारे आणि निर्णय घेणारे आहोत. अशावेळी जरांगे यांनी महाराष्ट्र बेचिराख करण्याची जी भाषा केली आहे त्याची सरकारने दखल घेतली पाहिजे. काहीतरी कट रचला जात होता, आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. छगन भुजबळ यांना देखील धमक्या देण्यात आल्या होत्या. तसेच उपमुख्यमंत्र्यांबाबत जी भाषा वापरली जाते आहे ती चुकीची आहे. देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख केला गेला असे यावेळी आशिष शेलार म्हणाले आहेत.
याबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.









