मुंबई : मराठा आरक्षण Maratha Reservation हा मुद्दा महाराष्ट्रात प्रचंड तापलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून चिघळला जातोय. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आक्रमक होत थेट गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली.
दरम्यान आता राज्य सरकार देखील आक्रमक भूमिका घेत आहे. असंच काहीसं चित्र दिसून येत आहे. कालपासून 1041 गुन्हे मराठा आंदोलकांच्या विरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. आता पर्यंत आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात येत होते. आता थेट मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून १०४१ गुन्हे मराठा आंदोलकांच्या विरुद्ध दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मराठवाडा आणि बीड जिल्ह्यामध्ये दाखल करण्यात आले असून अमळनेरमध्ये मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांना रास्ता रोको करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं समजत आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज भाजप आमदारांची एक बैठक देखील पार पडली. यावेळी भाजपा आमदारांना निवडणुकीच्या दृष्टीने आणि मराठा आरक्षण या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान या बैठकीमध्ये भाजपा आमदारांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. तसेच जर जरांगे राजकीय भाषा बोलत असतील तर त्यांना प्रत्युत्तर द्या असे देखील भाजप आमदारांनी म्हंटल आहे.