मुंबई : शिंदे फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालंय. पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला. नंतर तातडीने केंद्राची मंजुरी मिळवून घेण्यात आली. निर्णय वेगवान #महाराष्ट्र गतिमान ही शिंदे फडणवीस सरकारच्या जाहीरातीची टॅगलाइन आहे. शिंदे सरकारच्या एका वर्षात १४००० पेक्षा जास्त जीआर घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकार सामान्यांच सरकार असल्याच आपल्या भाषणातून नेहमीच सांगत असतात.
जीआर म्हणजे काय ?
राज्य सरकारने एखादा धोरणात्मक किंवा महत्त्वाचा निर्णय घेतल्यास त्याचा शासकीय आदेश (जी.आर.) काढला जातो. हा आदेश राज्यपालांच्या नावाने काढला जातो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जातो. या धोरणांची अंमलबजावणी केली जाते. पुढील बैठकीत इतिवृत्त मंजूर झाल्यावर संबंधित खात्याकडे फाईल जाते. खात्याकडून कायदेशीर बाब तपासून घेतली जाते वा वित्त खात्याच्या संमतीनंतर आदेश काढण्याची प्रक्रिया केली जाते.
शिंदे फडणवीस सरकारने घेतलेले महत्वाचे निर्णय
१. शिंदे फडणवीस सरकारने पहिल्याच बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेतला होता, तो म्हणजेच पेट्रोल आणि डिझेल वरील व्हॅट ५ रूपयांनी कमी करण्याचा. या निर्णयामुळे सामान्य लोकांना दिलासा मिळाला होता.
२. सर्व सामान्य नागरिकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय त्यांच्या आरोग्याशी निगडीत आहे. राज्याच्या महात्मा फुले आणि केंद्र सरकारचा आयुष्मान भारत आरोग्य योजना एकत्रित करण्यात आल्या. यामुळे राज्यातील सर्व सामान्य नागरिकांना ५ लाख पर्यंतचे उपचार मोफत मिळतील.
३. शेतकऱ्यांसाठी एक निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांना दरमहा ५०० रूपये थेट त्यांच्या बॅंक खात्यात टाकण्याचा निर्णय या सरकारने घेतला.
४. पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला. नंतर तातडीने केंद्राची मंजुरी मिळवून घेण्यात आली.
५. समृद्धी महामार्गाचं पहिल्याच टप्प्याच उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं. हा मार्ग लवकरच मुंबईपर्यंत पोहोचेल. त्यानंतर नागपूर ते मुंबई प्रवास जवळपास ७-८ तासात करता येईल.
६. केंद्र सरकारकडून किसान निधीचे सहा हजार रूपये आणि त्यात राज्यसरकारने सहा हजार रूपये टाकून १२००० रूपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
७. महिलांना एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत दिलीये तर ७५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी बस प्रवासाची सवलत दिली गेली. त्यामुळे शिंदे सरकारचा हा लोकप्रिय निर्णय असल्याचे बोलले जाते.
८. सध्या शासन आपल्या दारी या उपक्रमातून शिंदे फडणवीस सरकार प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्यांच्या योजना प्रत्येकाच्या दारी पोचतायेत की नाही किंवा त्या कशा पोहोचवल्या जातील याची माहीती देतायेत.
एका वर्षाच्या काळात या सरकारने गतिमानतेने अनेक निर्णय घेतले आहे.