राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 1 वर्ष 5 महिन्यानंतर नवाब मलिकांची सुटका झाली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकांना अटक करण्यात आली होती. पण मलिक जेव्हा तुरुंगात गेले तेव्हा राष्ट्रवादी एकच होती, पण सध्याची परिस्थिती बदलली असून आता राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट पडले आहेत. त्यामुळे नवाब मलिक आता कुठल्या गटात जाणार अशी चर्चा रंगली आहे.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणात नवाब मलिकांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी मलिक हे महाविकास आघाडी सरकारमध्ये अल्पसंख्याक मंत्री होते. गेल्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांना या प्रकरणी अटक झालेली. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. याआधी मलिकांनी मुंबई हाय कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. पण हाय कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. मग त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ज्यावर शुक्रवारी, 11 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. या सुनावणीत ईडीने त्यांच्या जामिनावर कोणतीही हरकत घेतली नाही. ज्यामुळे त्यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला.
जामीनाला ईडीचा विरोध नाही
नवाब मलिक हे आजारी आहेत त्यामुळे प्रकृतीचं कारण देत त्यांनी वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका दाखल केली होती. तर त्यांच्या वकिलांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार मलिक यांना किडनीचा आजार आहे. त्यांची एक किडनी ही निकामी झाली असल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली असल्याचं वकिलांनी म्हटलं होतं. सध्या मलिकांची एकच किडनी कार्यरत आहे. त्यांच्यावर मुंबईतील कुर्ला येथील क्रिटी केअर रूग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मात्र किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना दुसऱ्या रूग्णालयात दाखल करायचं असल्याने त्यांच्या जामीनाची मागणी करण्यात आली होती.
मात्र, आधी मलिकांनी जेव्हा जामीनाची मागणी केली होती तेव्हा ईडीने त्यांच्या जामीनासाठी जोरदार विरोध केला होता. पण आता सुप्रीम कोर्टात मात्र ईडीने कोणताही विरोध केला नाही, हे विशेष. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मलिक तुरुंगात गेल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक मोठे बदल झाले. ज्यावेळी मलिक तुरुंगात गेले तेव्हा ते एक मंत्री होते, पण तुरुंगात गेल्यानंतर सरकार बदललं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात नवी समीकरणं उदयास आली. शिवसेना पक्ष फुटला आणि महाविकास आघाडीची घडीच विस्कटली. सुरुवातीला शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली. तर वर्षभरानंतर राष्ट्रवादीही फुटली आणि राष्ट्रवादीतला एक गट सत्तेत सहभागी झाला, तर दुसरा विरोधी पक्षात आहे. शरद पवारांना मानणारा आणि दुसरा अजित पवारांना मानणारा असे दोन गट राष्ट्रवादीत पडले.
नवाब मलिकांसमोर पेच
शरद पवारांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे अनेक बडे नेते आज त्यांची साथ सोडून भाजपसोबत गेले आहेत. पण मलिक हे तुरुंगात असल्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट झाली नव्हती. मात्र आता त्यांची सुटका झाली आहे, त्यामुळे नवाब मलिक कुठल्या गटाला पाठिंबा देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांसोबत जाणाऱ्या नेत्यांमध्ये छगन भुजबळ, प्रफुल पटेल, हसन मुश्रीफ अशा नेत्यांची नावं आहेत, ज्यांच्या मागे ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणा लागल्या होत्या. या कारवाईतून सुटका करण्यासाठीच त्यांनी भाजपशी युती केली, अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. त्यामुळे मलिक सुद्धा आता अजित पवरांसोबत भाजपशी हातमिळवणी करणार का हे पाहावं लागेल.
भाजपची प्रतिक्रिया काय?
मलिक जर अजित पवार गटासोबत गेले तर यामुळे भाजपचीही गोची होण्याची शक्यता आहे. कारण याआधी भाजपकडून नवाब मलिक यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यावेळी गँगस्टर दाऊदसोबत त्यांचे संबंध असल्याचं बोललं गेलं. त्यामुळे आता जर त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला तर हे भाजपला चालणार का? भाजप त्यांचा स्वीकार करणार का? असे महत्त्वाचे प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत. पण असं असलं तरी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातही ईडी, सीबीआयच्या कारवाया झाल्या. देशमुखांनाही 14 महीने तुरुंगवास भोगावा लागला होता. पण ज्यावेळी शरद पवार की अजित पवार असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा ते शरद पवारांसोबतच कायम राहिले. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा मागे लागलेल्यांची ही दोन्ही उदराहरणं पाहिली तर नवाब मलिक अजित पवार गटात जाणार की देशमुखांसारखे शरद पवारांशी एकनिष्ठ राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.