दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पावसाअभावी महाराष्ट्रात भाजीपाल्यासोबतच सर्वकाही महागण्याची शक्यता आहे. डाळींवर तर त्याचा परिणाम आधीपासूनच दिसू लागला असून तूरडाळ किरकोळ बाजारात तब्बल 50 ते 60 रुपयांनी महागल्याचे चित्र आहे. तांदळाचे दरही 9 टक्क्यांनी वाढले आहेत.
पावसाने ओढ दिल्यामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊन सोयाबीनसह अन्य खाद्यपदार्थांच्या किमतीही झपाट्याने वाढू शकतात असा अंदाज आहे. दरम्यान, साखरेपासून तांदळापर्यंत सर्वच महागले असल्याची माहिती स्थानिक दुकानदारांनी दिली आहे.
चार महिन्यांपूर्वी होलसेल बाजारात 125 ते 130 रुपयांवर असणारे तूरडाळीचे दर तब्बल 170 ते 175 रुपयांवर गेल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे. आयात तूरडाळीचे दर 85 ते 90 रुपये होते. हे आता 150 ते 160 रुपयांवर गेल्याचे देखील त्यांनी सांगितले.