पुढील शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. मुंबई विद्यापीठ सलंग्नित बिगर स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 3/4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. 3/4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमाना मंजुरी मिळाली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने मानव्यविद्याशाखा, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या 3/4 वर्षीय पदवीचे अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा तयार केला असून शैक्षणिक वर्ष 2024-25पासून विद्यापीठातील सर्व बिगर स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता हे अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. यापूर्वी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित राज्यातील सर्वाधिक 62 स्वायत्त महाविद्यालयांत 4 वर्षीय पदवीचे अभ्यासक्रम राबविण्यात आले.
राष्ट्रीय धोरणानुसार प्रागतिक दृष्टिकोन ठेऊन सर्व 812 बिगर स्वायत महाविद्यालयांसाठी विद्यापीठाने अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा तयार केला आहे. आता विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय, बहुआयामी, लवचिक, रोजगाराभिमुख आणि कौशल्याची जोड असलेले अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत.