पिंपरी : हिंजवडी येथे गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असताना एका तरुणाच्या मृत्यूची घटना घडली. डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती क्षणार्धात पसरली होती. मात्र हिंजवडी पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती मिळाली असता संबंधित तरुण कोणत्याही डीजे समोर नाचत नसल्याचे समोर आले आहे.
पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरात मेडिकल दुकानात एक तरुण गोळ्या आणण्यासाठी गेला होता. मात्र तो दुकानाजवळ चक्कर येऊन पडला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे समोर आले. योगेश अभिमन्यू साखरे (वय 23, रा. मारुती मंदिरासमोर हिंजवडी गावठाण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या घटनेबाबत हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेली माहिती अशी की, तरुण योगेश साखरे याला जवळपास सहा महिन्यांपासून बीपीचा त्रास होत होता. त्यानंतर तो हिंजवडी येथील स्थानिक डॉक्टरांकडे निदान करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला डॉक्टरांनी सांगितले होते की, हृदयाचा त्रास आहे त्यामुळे स्वतःवर उपचार कर. त्यामुळे योगेश बुधवारी हिंजवडी येथील चौकात आला. त्यावेळी त्याच्या छातीत दुखू लागले म्हणून तो गोळ्या घेण्यासाठी मेडिकलमध्ये आला होता.
योगेश हा कुठल्याही डीजे समोर नाचत नव्हता असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले आहे. तो ज्या मेडिकलसमोर उभा होता, त्या ठिकाणी किंवा जवळपास कोणताही डीजेही वाजत नव्हता. त्याने जवळ असलेल्या मित्रांना सांगितले की, मला चक्कर येत आहे. इतक्यातच तो खाली जमिनीवर कोसळला. त्यानंतर मित्रांनी त्याला जवळ असलेल्या रणजित हॉस्पिटल येथे तात्काळ दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला रुबी हॉस्पिटल हिंजवडी येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्याला तिथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी औंध हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.