मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान महाविकास आघाडीमध्ये देखील राजकीय खलबत् सुरू आहेत. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना देखील बैठकीसाठी तातडीने बोलावणे आले आहे.
महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना पाठवलेल्या पत्रकामध्ये लिहिले आहे की, ” देश अत्यंत कठीण कालखंडातून जात आहे. आपण स्वतः महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या हुकूमशाही विरोधात खंबीरपणे आवाज उठवत आहात. देश आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हुकूमशाही विरुद्ध लढा देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक असून दिनांक 25 जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत वंचित आघाडीने सहभागी व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. कृपया वंचित तर्फे महत्त्वाचे नेते आपण आजच्या बैठकीसाठी पाठवावे ही विनंती. ” असं या पत्रकामध्ये म्हटलं आहे.