Harishchandra gad Trek : पावसाळा आला की निसर्गाच्या कुशीत जाऊन काही क्षण आनंद घ्यावा, असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र सावधान ! पावसाळ्यात दरड कोसळणे, वीज पडणे, पूर येणे, प्रसिद्ध पर्यटन ठिकाणी कोंडी होणे अशा अनेक धोकादायक परिस्थितीला पर्यटकांना सामोरे जावे लागत असल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. त्यात आणखीन एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. या माहितीनुसार काही तरुण हरिश्चंद्र गड चढायला गेले.परंतू गडावरील मार्ग चुकून कडाक्याच्या थंडीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात त्याच्यासोबत असलेल्या आणखी ३ तरुणांवर उपचार सुरु आहेत.
घटनाक्रम काय आहे?(Harishchandra gad Trek)
ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या हरिश्चंद्र गडच्या पायथ्याच्या परिसरात घडली आहे. अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्रय आंबेकर, तुकाराम आसाराम तिपाले,महादू जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे आणि अनिल उर्फ बाळू नाथाराम गिते असे एकूण सहा तरुण पुण्यात कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यातील बाळू नाथाराम गिते हा लातूरचा रहिवासी होता, तर बाकीचे तरुण पुण्यातील लोहगाव येथील रहिवासी आहेत. या सगळ्या तरुणांना १ ऑगस्टला सुट्टी होती म्हणून यांनी हरिश्चंद्र गड चढायचं ठरवलं होतं.
हरिश्चंद्र गडाचा मोह
हरिश्चंद्र गड हे गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध स्थळ असून येथे अनेक गिर्यारोहकांची आणि पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. हरिश्चंद्र गड हे ‘इंद्रवज्र’ पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘इंद्रवज्र’ म्हणजे आकाशात गोल आकारात पांढऱ्या रंगांची दिसणारी प्रकाशाची एक विलक्षण प्रतिकृती आहे. त्यावर अनेक सोशल मीडिया क्रिएटर्सनी व्हिडीओ आणि रील्स बनवून सोशल मीडियावर अपलोड केलेले आहेत. हे रील्स पाहून या तरुणांनाही हरिश्चंद्र गडावर जावं असा मोह झाला. या मोहामुळे हे सगळे तरुण हरिश्चंद्र गडाच्या दिशेने निघाले.
हरीश्चंद्र गडाच्या रस्त्याची नव्हती पूर्व कल्पना
१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या तरुणांनी तोलार खिंडीतून गडावर चढण्यास सुरुवात केली. मात्र या तरुणांना या गडापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याच गोष्टींची पूर्व कल्पना नव्हती. ते या अगोदर कधीच हरिश्चंद्र गडावर गेले नव्हते. त्यांना या रस्त्यांचीही माहिती नव्हती आणि त्यांच्या सोबत गाईड पण नव्हता. या भागात मोबाईलला नेटवर्क ही मिळत नाही. एकंदरीत या तरूणांकडे मदतीची कोणतीच आस नव्हती.
हरीश्चंद्र गडाचा भयावह घेरा
अशात हरीश्चंद्र गडाचा भयंकर मोठा घेरा… त्यात भयंकर पाऊस, धुक्याची दाट-दडप चादर, गवत मोठ्या प्रमाणात असल्यानं पायवाटही दिसत नव्हती. परिणामी हे तरुण रस्ता भरकटले. दोन दिवस हरिश्चंद्र गडाच्या जंगलात हे तरुण पावसात रस्ता शोधत होते. रस्ता भरकटल्याने सहा जणांनी डोंगर कपारीत मुक्काम केला होता.
2 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा दहा दरम्यान गीते हे मयत झाले. त्यांनतर इतर पाच जण मृतदेह बरोबर घेऊन रस्ता पहात मदतीसाठी फिरत होते. त्यानंतर त्यांच्याबरोबर १४ वर्षीय हरीओम विठ्ठल बोरूडे हा ही आजारी पडला. मग गीते यांच्या बॉडी बरोबर दोघे थांबून इतर दोघे हरीओमला बरोबर घेऊन मदतीसाठी फिरू लागले व थकून एक जागी निवऱ्याला बसले. दरम्यान परिसरात मुंबईचा ग्रुप परतीच्या मार्गावर असताना रस्ता चुकून त्यांना भेटला. या तरुणांनी त्यांना घडलेली सर्व हकिकत सांगून मदत पाठवण्याची विनंती केली.
प्रशासनाकडून रेस्क्यू
याची माहिती तिथल्या गावकऱ्यांनी वनविभाग आणि पोलिसांना दिली. त्यानंतर गावकरी, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने गुरूवारी, 3 ऑगस्ट रोजी सकाळी मयत व्यक्तीसह पर्यटकांना गडावरून रेस्क्यू केलं. यात तीन तरुणांची प्रकृती खालवल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या तरुणांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ट्रेकिंगची पूर्व तयारी नाही
या तरुणांनी कुठलीही पूर्व तयारी करून चढाई केली नव्हती. त्यामुळे यांच्याकडे रेनकोट, टॉर्च, पिण्यासाठी पाणी, खाद्यपदार्थ असे कुठलेच साधन उपलब्ध नव्हते जे त्यांच्या मदतीला आले असते. परिणामी दोन दिवस विना अन्न-पाण्याने त्यांच्या शरीरात ऊर्जा राहिली नाही. वरून जोरदार पावसात दोन दिवस अंगावर ओले कपडे असल्याने त्यांच्या शरीरात थंडी भरली. यात अनिल उर्फ बाळू नाथाराम गिते हा शरीराने दुबळा होता आणि दोन दिवसाच्या कडाक्याच्या थंडीला तो सहन करू शकला नाही. परिणामी याचा त्याचा मृत्यू झाला. मात्र या तरुणांनी जर माहितीपूर्ण पूर्व तयारी करून ट्रेक केले असते तर कदाचित त्या तरुणाचा जीव वाचला असता.