पंढरपूर : खरंतर विठुरायाच्या चरणी भक्ती भावाने वाहिलेलं एखाद तुळशी पान आणि लाखो करोडोंचे दागिने यांची किंमत त्याच्यासाठी एकच आहे. मनातला भाव जास्त महत्त्वाचा ! पण विठुरायाचे ते भारावून टाकणार रूप आता हिऱ्यामाणकांच्या भरजरी घोंगड्याने चकाकणार आहे. एका महिला माऊलीने हे हिरे मानकाने विणलेले घोंगडे विठुरायाच्या चरणी अर्पण केले आहे.

पंढरपुरातून ही उल्हासित करणारी बातमी येते आहे. या महिला माऊलीने आपलं नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर 55 लाखांचं हे हिरेजडीत सोन्याच घोंगड विठुराया चरणी अर्पण केल आहे. विशेष म्हणजे या महिला माऊलीने यापूर्वी देखील विठुराया चरणी पावणे दोन किलो वजनाचे सोन्याचे धोतर तसेच चंदनाचा हार आणि कंठा असे सव्वा कोटी रुपयांचे दागिने देखील अर्पण केले होते. तसेच वसंत पंचमीला एक कोटी ऐंशी लाख रुपयांचे दागिने पांडुरंगाला आणि माता रुक्मिणीला विवाहासाठी अर्पण केले होते. कौतुक म्हणजे अगदी मंदिर समितीने आयोजित केलेला सत्कार स्वीकारायला देखील या महिला माऊली उपस्थित राहिल्या नाहीत हीच खरी पांडुरंग भक्ती !