मुंबई : कालपासून सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल Viral Video होतं आहे. सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेऊ. तर या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ड्रायव्हिंग सीटवर बसत आहेत. त्यांच्या शेजारच्या सीटवर त्या गाडीचा ड्रायव्हर बसलेला आहे. मागच्या सीटवर ज्यावर सामान्यतः तिघे प्रौढ लोक बसू शकतात. त्या सीटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यानंतर गिरीश महाजन हे देखील बसले. या चौघा जणांना बसताना चांगलीच दाटीवाटी होते आहे हे स्पष्ट दिसून येते आहे. यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होतोय, पहा हा व्हिडिओ…
तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी भन्नाट टीका करायला सुरुवात केली. यामध्ये सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आणि त्यास कॅप्शन दिले आहे की यासाठीच पक्ष फोडला का ? जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी अशी विनोदी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे.
दरम्यान यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, ” व्हिडिओ व्हायरल करणारे मूर्ख लोक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या वेळी कोणी कोणत्या गाडीत बसणार हे चेक केलं जातं. मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश महाजन यांना गालावर जखम झालेली आहे. या कार्यक्रमा वेळी त्यांना गाडी शिल्लक राहिली नाही. त्यामुळे त्यांना आमच्या गाडीत बोलवलं. आपल्याला जवळच जायचंय आपण दाटीवाटीने जाऊयात. असं मी त्यांना सांगितलं होतं. आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाहीत. सर्वांना सोबत घेऊन जाणारी माणसं आहोत. त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केल. “