नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषण दररोज नवनवीन आणि धोक्याची पातळी ओलांडत आहे. याच पार्श्वभूमीवर दिवाळीत फटाक्यांवर बंदी असणार आहे. दरम्यान, फटाक्यांवरील बंदीवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, फटाक्यांवर बंदी केवळ दिल्लीतच नाही तर संपूर्ण देशात असावी. न्यायालयाने म्हटले आहे की, आमच्या आधीच्या आदेशात आम्ही फटाक्यांवर पूर्ण बंदीचा मुद्दा स्थानिक सरकारवर सोडला होता. रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणी फटाक्यांसाठी वेळेची मर्यादा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
हे वाचलेत का ? काश्मीर खोऱ्यात दुमदुमला छत्रपतींचा जयघोष; छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सैनिकांना प्रेरणादायी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इतकंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशाचा संदर्भ देत राजस्थानसारख्या एनसीआरअंतर्गत येणाऱ्या भागातही फटाक्यांवरील बंदी लागू असेल, असं म्हटलं आहे. याशिवाय वाढते प्रदूषण लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयानेही कडक निर्णय दिला आहे. न्यायालयाने पंजाब सरकारला पराली जाळणे थांबवण्यास सांगितले आहे. सरकारने पराली जाळणे थांबवावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. आपण नेहमीच राजकीय लढाई लढू शकत नाही. न्यायालयाने राजस्थान आणि इतर राज्य सरकारांना त्यांच्या आधीच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यास सांगितले.
फटाके फोडण्या बाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आता लहान मुलांपेक्षा प्रौढ लोक जास्त फटाके वापरतात. लोकांनी पर्यावरणाचा विचार करण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सर्व राज्य सरकारांना आवश्यक ती पावले उचलावी लागतील. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीसंदर्भात कोणताही देशव्यापी आदेश दिलेला नाही. अशा परिस्थितीत कोणत्या राज्यात फटाके चालवता येतील किंवा कोणत्या राज्यात चालवता येणार नाहीत, हे राज्य सरकार ठरवते.