मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर मुंबई आणि पुण्यात दाखल असणारे सर्व गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. तसेच सायबर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तपास देखील बंद करण्यात आला आहे. दरम्यान आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावरील सर्व गुन्हे रद्द करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती होऊ शकते, या चर्चेला उधाण आले होते. त्यानुसार आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाली आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवर एक पोस्ट करून महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदी श्रीमती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन असे कॅप्शन दिले आहे.
https://twitter.com/SMungantiwar/status/1709811492659609962
काय होते फोन टायपिंग प्रकरण
ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, तात्कालीन मंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या सुनावणी मध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई आणि पुण्यामध्ये दाखल झालेले गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत.