मुंबई : मुंबई बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये काही हरणं दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे ही हरणं प्लास्टिक पिशवी खाताना दिसून येत आहेत. या व्हिडिओतून उद्यानातील वन्य प्राण्यांच्या जीविताला धोका असल्याचं स्पष्ट दिसून येते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रोज अनेक पर्यटक या वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी येत असतात. परंतु या पर्यटकांकडून प्लास्टिक पिशवी, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या या वस्तू बेजबाबदारपणे फेकून दिल्या जात असल्याच दिसून येते. मुक्या निष्पाप जनावरांना या पिशव्यांमधील खाद्य पदार्थांच्या लालसेने जीवाला मुकावे लागू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्यानामध्ये पर्यटकांना खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी असणे आवश्यक आहे. उद्यानात सुरक्षारक्षकांकडून देखील पर्यटकांचे तपासणी करत असताना हलगर्जीपणा होतोय का असा प्रश्न देखील आता निर्माण होतोय.