पुणे : पुणे विद्यापीठातील हॉस्टेलच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं होतं. या घटनेनंतर पुणे विद्यापीठात तुफान राडा झाला आहे. या आक्षेपार्ह लिखाणाचा भाजप युवा मोर्चाने जोरदार निषेध नोंदवला आहे. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे विद्यापीठ परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी एसएफआयच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. दोन्ही संधटनांचे तुफान राडा झाल्याने विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आठ नंबर होस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पद्धतीची पेंटिंग काढण्यात आली होती. यावेळी आक्षेपार्ह मजकूरही लिहिण्यात आला होता. या घटनेचा अभाविपने निषेध नोंदवला. तसेच विद्यापीठाने तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार देऊन संबंधितांना अटक करून गुन्हे दाखल करा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराच अभाविपने दिला होता. मात्र, विद्यापीठाकडून कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने अखेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार निदर्शने केली आहेत.
सध्या परिसरातील तणाव निवळला आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून विद्यापीठ परिसरात अजूनही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.