Mumbai Agripaadaa Fire news : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना वाढल्या आहे. आज सकाळी देखील आग्रीपाडा येथील जहांगीर बोमन मार्गावरील एका २२ मजली इमारतीला सकाळी ८ च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग चौथ्या मजल्यावरील डक्ट एरियामध्ये लागली आणि पाहता पाहता इमारतीच्या वरच्या मजल्या पर्यंत ही आग पसरली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक पोहचले असून इमारतीतील नागरिकांना जिन्याच्या साह्याने बाहेर काढण्यात आले आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे. (Mumbai Agripaadaa Fire news)
आग्रीपाडा पोलीस ठाण्याजवळील २२ मजली इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये आज सोमवारी सकाळी ८ वाजता अचानक आग लागली. ही आग चौथ्या मजल्यावरील डक्ट एरियामध्ये लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण करत इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पसरली. सुदैवाने ही आग इलेक्ट्रिक वायरिंग आणि इन्स्टॉलेशन्सपर्यंतच मर्यादित राहिली. आगीची माहिती कळताच नागरीक जिवाच्या भीतीने विविध मजल्यांवरून जिन्यातून बाहेर पडले.
या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. तातडीने अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी देखील इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. सध्या सगळ्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. अग्निशामक दलाने ही आग लेव्हल-१ म्हणून घोषित केली आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासूंन आगीच्या घटना सातत्याने वाढत आहे. मोठ्या इमारतीमध्ये या घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.