Maratha Reservation: राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा-कुणबी आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा जोरात आहे. राज्यात या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारने मराठवाड्यासह सर्वत्र मराठा-कुणबी जातीच्या नोंदी तपासण्यास सुरुवात केली. पण या तपासादरम्यान समोर आलेली आकडेवारी ही मात्र अचंबित करणारी आहे. ज्या मराठवाड्यापासून कुणबी नोंदी तपासण्यास सुरुवात झाली तिथे कुणबी जातीच्या २३ हजार ७२८ सापडल्या आहेत. (maratha reservation manoj jarange patil maharashtra news)
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी उपोषण केले होते. राज्य सरकारने त्यांना मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात मराठा-कुणबी जातीच्या नोंदी तपासण्याचे आश्वासन दिले होते.
मागील पंधरा दिवसात राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये या कामासाठी जास्तीचा कर्मचारी वर्ग देऊन या नोंदी तपासण्यास सुरुवात केली असून ही छाननी या महिन्यातही सुरुच राहणार आहे. मात्र मागील पंधरा दिवसात राज्यात २९ लाख १ हजार १२१ नोंदी सापडल्या आहेत.
सर्वात जास्त विदर्भामध्ये १३ लाख ३ हजार ८८५ नोंदी सापडल्या आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ४ लाख ४७ हजार ७९२ नोंदींचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५ लाख ६६ हजार ९६४ नोंदी तपासल्यानंतर देखील सर्वात कमी ११८ कुणबी-मराठा नोंदी सापडल्या आहेत.
१६.११.२०२३ अखेर नोंदीची सद्यःस्थिती
आणखी वाचा – OpenAI Sam Altman Ousted : स्वत:चा कंपनीतून मालकाची हकालपट्टी, काय आहे प्रकरण?
विभाग – तपासलेल्या नोंदी – कुणबी नोंदी
कोकण – १,२७,१२,७७५ – १,४७,५२९
पुणे – २,१४,४७,५१ – २,६१,३१५
नाशिक – १,८८,४१,७५६ – ४,७०,९००
छत्रपती संभाजीनगर – १,९१,५१,४०८ – २३,७२८
अमरावती – १,१२,१२,७०० – १३,०३,८८५
नागपूर – ६५,६७,१२९ – ६,९३,७६४
तपासलेल्या नोंदी – ८,९९,३३,२८१
एकूण कुणबी नोंदी – २९,०१,१२१
दरम्यान, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात विषेश कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आले आहे. या शिवाय न्यायालयातील जुन्या अभिलेख्यांमध्ये देखील कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, कुणबी असे जातीवाचक उल्लेख असलेले (सन 1967 पुर्वीचे) अभिलेखे उपलब्ध करुन देणे बाबत संबंधित न्यायालयाकडे विनंती करुन अभिलेखे उपलब्ध करुन घेण्यात येत आहेत.