मुंबई : सध्या मराठा आरक्षण Maratha Reservation आणि जरांगे पाटील या विषयावर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण देखील तापलं आहे. सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच आता विरोधक देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका करत आहेत.
काय म्हणाले खासदार संजय राऊत
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, ” मनोज जरांगे पाटील यांच्या मागचा बोलवता धनी कोण? हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. हे सर्व घडवणारे कोण आहेत ? सरकारचा हिस्सा आहेत का ? महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करून वेगळं राजकारण करायचं आहे का ? हे तुम्हाला माहीत नसेल तर गृहमंत्री पद तुमच्याकडे गोट्या खेळायला आहे का ? असा बोचरा सवाल त्यांनी फडणवीसांना केला आहे.
रश्मी शुक्लांना संजय राऊतांचा सवाल
यावेळी संजय राऊत यांनी डीजी रश्मी शुक्ला यांच्यावर देखील पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली होती. यावरच पुन्हा एकदा संजय राऊत यांनी बोट ठेवून कडवी टीका केली आहे. ते म्हणाले की, ” मनोज जरांगे पाटील यांचे फोन टॅप केले जात असतील याबाबतीत रश्मी शुक्ला अनुभवी आहेत. त्यासाठी त्यांना बसवले. रश्मी शुक्ला डीजी यांच्यापेक्षा हे जास्त कोणाला माहित असेल ? गृहमंत्र्यांनी अनुभवी रश्मी शुक्लांशी चर्चा करावी, कोण कोणाला फोन करते ते आपल्या सरकारमध्ये आहेत का ? ते महाराष्ट्राला पेटवायला निघाले आहेत का ? ही माहिती नसेल तर हे राज्याचे दुर्दैव आहे. ” असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.









