मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीची तारीख आणि वेळ ठरली आहे. येत्या १४ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात याप्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमका काय निर्णय होणार ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाणून बुजून या प्रकरणावर सुनावणी घेण्यास विलंब करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. तर कायदेशीर बाबी आणि आमदारांकडून लेखी उत्तर मागितल्यानंतरच या प्रकरणाची सुनावणी सुरू होईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केला होता.
दरम्यान शिंदे गटाने तब्बल ६ हजार पानांचं उत्तर सादर केले आहे. विधिमंडळात या कागपत्रांची पडताळणी झाल्यानंतर आता या प्रकरणाच्या सुनावणीला १४ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होणार असून संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावलं जाणार आहे. आता या सुनावणीकडे राजकीय पक्ष आणि अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.