जम्मू काश्मीर : लष्कर ए तौयबाच्या प्रॉक्सी द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) शी संबंधित दहशतवाद्यांनी बुधवारी जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये हल्ला केला. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यामध्ये सैन्याचे तीन बड्या रँकचे अधिकारी शहीद झाले आहेत. यामध्ये कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष ढोंचक आणि पोलीस अधिकारी हुमायून भट हे तिघे शहीद झाले आहेत.
बुधवारी जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये या दहशतवाद्यांनी हल्ला केला हे हल्ला करणारे दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती जवानांची टीम एका उंच जागेवर प्रतिहल्ला करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला समोरून अचानक गोळीबार सुरू झाल्याने कर्नल मनप्रीत सिंग यांचा जागीच मृत्यू झाला आणि इतर दोन अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्या होत्या. या अधिकाऱ्यांना तातडीने विमानाने श्रीनगर येथील रुग्णालयात नेण्यात आलं होतं, परंतु त्यांचे प्राण वाचवण्यात यश येऊ शकले नाही.
राष्ट्रीय रायफल्सचे युनिट कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, कंपनी कमांडर मेजर आशिष ढोंचक आणि जम्मू काश्मीरचे हुमायून भट हे तिघेजण या हल्ल्यामध्ये शहीद झाले आहेत. कर्नल मनप्रीत सिंग हे या ऑपरेशनचे नेतृत्व करत होते. त्यांना 2021 मध्ये शौर्यासाठी सेनापदक प्रदान करण्यात आले होते. तर आशिष धोंचक यांना 15 ऑगस्ट 2023 ला शौर्य पदक प्रदान करण्यात आले होते. तर पोलीस अधिकारी हुमायून भट यांचे वडील हे जम्मू काश्मीर पोलीस प्रशासनामध्ये आईजी पदावरून निवृत्त झाले आहेत. या तीनही बड्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्यामध्ये आपले प्राण गमावले आहेत.
या अतिरेकी हल्ल्यासाठी उजेर खान हा जबाबदार असल्याचे म्हटले जाते आहे. हा संपूर्ण हल्ला दोन दहशतवाद्यांनी केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.