नवी दिल्ली : दिल्लीत G20 Summit ला आज सुरुवात झाली आहे. या शक्तीशाली आंतरराष्ट्रीय समुहाचं यजमानपद हे भारतासाठी अभिमानास्पद आहे. आज या बैठकीच्या निमित्तानं एक ऐतिहासिक घोषणाही झाली. ज्या घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष होतं ती महत्वाची घोषणा अखेर भारतात झाली आणि ती देखील यजमान असलेल्या भारताच्या पंतप्रधानांकडूनच करण्यात आली.
आफ्रिकन युनियन हाही आता जी 20 परिषदेचा कायमचा सदस्य असेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. 55 राष्ट्रांचा समूह असलेल्या आफ्रिकन युनियनचा समावेश हे या बैठकीचं सर्वात ठळक वैशिष्ट्य असेल. पंतप्रधान मोदींनी घोषणा केल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सन्मानानं आफ्रिकन युनियनच्या अध्यक्षांना बैठकीत समाविष्ट केलं. जी 20 मध्ये युरोपियन युनियनचा समावेश आधीपासून आहे.
आता आफ्रिकन युनियन पण समाविष्ट होईल. ही शिखर परिषद सुरु होण्याआधीपासूनच पंतप्रधान मोदी आफ्रिकन युनियनच्या समावेशाबद्दल किती आग्रही आहेत हे दिसत होतं. जागतिक राजकारणात ज्यांनी आपला आवाज ऐकला जात नाही, असं वाटतं, त्यांना सोबत घेण्याची गरज आहे, असं ते म्हणत होते. सबका साथ सबका विकास या देशात वापरल्या जाणाऱ्या संकल्पनेलाही त्यांनी या महत्वपूर्ण पावलाशी जोडल्याचं दिसून आलं. पाठीमागे कोणार्कमधल्या सूर्यमंदिराची भव्य प्रतिमा आणि त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हे जी 20 परिषदेतल्या एकेक राष्ट्रप्रमुखाचं स्वागत करतायत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी गळाभेट, सौदी अरेबियाच्या राजपुत्रांना अलिंगन तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी खास केमिस्ट्री…बाकी कुणाला नाही पण बायडन यांना तर कोणार्कच्या सूर्यमंदिराचा हा कालचक्र काय आहे, त्याचं महत्व काय हेही सांगताना ते दिसले. या बैठकीच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी 3 दिवसांत 15 द्विपक्षीय चर्चा करणार आहेत . त्यात अमेरिका, सौदी अरेबियासोबतच्या त्यांच्या बैठकांकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
अमेरिकेसोबत जेट इंजिनची भारतात निर्मिती करण्यासंदर्भात आणि मिलिट्री ड्रोन खरेदी करण्यासंदर्भात काही महत्वाचे करार होतात का याकडे लक्ष भारत- अमेरिका- सौदी अरेबिया यांच्यात युरोप मिडल इस्ट आणि भारत रेल्वे आणि बंदर मार्गानं जोडण्याबाबतही काही महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. बैठक संपल्यानंतर जे संयुक्त निवेदन सादर केलं जातं. त्यात युक्रेन युद्दाबद्दलचा उल्लेख असणार का याचीही चर्चा आहे. तूर्तास याबद्दलचा पॅराग्राफ रिक्त ठेवला गेला आहे. शब्दांची निवड काय असावी याबाबत काथ्याकूट सुरु आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थिती नाहीय. युक्रेन युद्धापासून पुतिन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाणं टाळतायत. पण चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थितीचं कारण काय ते समजू शकले नाहीय.