महाड : महाडमधील केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यूदेह सापडले आहेत. तर दोन कामगार अजूनही बेपत्ता आहेत. जवळपास 10 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. महाडमधील ब्लू जेट केमिकल कंपनीत शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आग लागली होती. दरम्यान पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जे कामगार कंपनीत अडकले होते, आगीत अडकलेल्या ११ जणांपैकी ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत. स्फोटाची भीषणता पाहून कालच NDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.
दरम्यान, काल सकाळी स्फोटानंतर कंपनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा पत्ता लागत नसल्याने NDRF पथक बोलावण्यात आलं होतं. शुक्रवारी संध्याकाळी हे पथक घटनास्थळी दाखल झालं. या पथकाने रात्री 11.30 च्या सुमारास कंपनीत ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यावेळी त्यांना आधी 4 मृतदेह सापडले. नंतर आणखी 3 मृतदेह हाती लागले. त्यानंतर आज आणखी दोन कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळून आल्याने, 11 पैकी 9 कामगारांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांना कंपनीतर्फे 30 लाख रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपये आणि विमा कंपनीच्या माध्यमातून 9 ते 18 लाख, अशी एकूण 45 लाखांपर्यत मदत मिळवून देऊ, अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली.