मुंबई : आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर पहिला सेमी फायनल भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पार पडणार आहे. आज दुपारपासून हा सामना सुरू होणार असून प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र या आनंदात कोणीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला आहे. भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान वानखेडे स्टेटिअममध्ये आग लावू अशी धमकी अज्ञात व्यक्तीने एक्सवरून धमकी दिली आहे. या पार्श्श्वभूमीवर स्टेडिअम परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.
हे वाचलेत का ? 2023 World Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्त्वाचा दिवस; आज India vs New Zealand यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगणार
वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज पहिला सेमी फायनल सामना आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना पार पडणार आहे. भारतीय संघाची आतापर्यंतची जबरदस्त कामगिरी असली तरीही फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना जिंकणे महत्वाचं आहे. या सामन्याआधी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त असून प्रेक्षकांसाठी चांगली सोय केली आहे. पण त्यापूर्वीच एक्सवरून ही धमकी मिळाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
या धमकीनंतर मुंबई पोलिस अलर्ट झाले असून स्टेडिअममधील आणि त्याच्या आसापासच्या परिसरातील बंदोबस्त वाढवून सुरक्षा व्यवस्थेतही वाढ केली आहे. ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आयडी कार्ड तपासून, त्याची ओळख पटवून मगच आत पाठवण्यात येत आहे . तसेच बॉम्बसोधक पथकही स्टेडिअममध्ये दाखल झाले असून कसून शोध घेण्यात येत आहे.