मुंबई : मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. येत्या 24 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे यांची तोफ मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात धडाडणार आहे. दसरा मेळावा ही शिवसेना पक्षाची परंपरा आहे.
दादरच्या शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट दोघेही उत्सुक होते. दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता यावा, यासाठी ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेकडे १ महिना आधीच अर्ज करण्यात आला होता. मुंबई महापाहिकेने ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. तसा अर्ज दोन्ही बाजूने करण्यात आला होता. मात्र शिंदे गटाने आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे देखील उत्सुक होते. मागच्या वर्षीही त्यांनी इथेच मेळावा घेता यावा यासाठी अर्ज देखील केला होता. पण परवानगी न मिळाल्याने अखेर त्यांनी वांद्र्यातील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेतला.