मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यान मालगाडीचे चार डबे रुळावरुन खाली घसरले. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवर झाल्याचं पाहायला मिळतयं. या घटनेमुळे एक्सप्रेसच्या पाच गाड्या उशीरा धावत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
शनिवार (30 सप्टेंबर) रोजी दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी पनवेलवरुन वसईकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरुन घसरले. यामध्ये वॅगन आणि ब्रेकव्हॅन असे डबे रेल्वे रुळावरुन घसरल्यामुळे पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.रुळावरुन घसरलेले डबे बाजूला सारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
या अपघातामुळे पाच एक्सप्रेस रखडल्या आहेत. यामध्ये डाऊन मार्गावरील गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस ही कळंबोली स्थानकावर थांबवण्यात आली. तसेच एलटीटी-मंगळुरु एक्स्प्रेस ही ठाणे स्थानकावर थांबण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल-सावंतवाडी एक्स्प्रेस ही तळोजा ते पंचानंद स्थानकादरम्यान थांबवण्यात आली आहे. तसेच अप मार्गावरील कोचुवेली-इंदूर एक्स्प्रेस आणि एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस या सोमाठाणे रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत.