पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे येथे रविवारी रात्री अचानक एकामागोमाग एक नऊ स्फोट झाले. मात्र, स्फोट कशाचे झाले हे काही समोर आले नव्हते. पोलिसांनी केलेल्या अंतिम तपासात टँकर मधून अनधिकृत रित्या गॅस चोरी करताना गॅसच्या नऊ टाक्याचे स्फोट झाल्याचे समोर आले. या स्फोटाने शेजारी असलेल्या इमारती अक्षरशः हादरून गेल्या होत्या. मात्र, अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या स्फोटात तीन स्कूल बस जळून खाक झाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड शहरात गॅस चोरीचा गोरख धंदा सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले. हा सर्व प्रकार जेएसपीएम या संस्थेलगत घडला. मात्र, या घडलेल्या स्फोटाला आणि गॅस चोरीला पोलिस प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पोलिसांवर केला आहे.
तानाजी सावंत यांनी आज सकाळी या घटनास्थळाला भेट दिली. संपूर्ण पाहणी केल्यानंतर त्यांनी या गॅस चोरीला पोलिसच जबाबदार असल्याचे तानाजी सावंत म्हणाले आहेत. तानाजी सावंत यांच्या जेएसपीएम संस्थेच्या ब्लॉसम शाळेलगत हा धक्कादायक प्रकार घडला. सावंत यांनी थेट ससूनमधील ड्रग्स माफियाशीच या घटनेची तुलना केल्याचे पहायला मिळाले.
जेएसपीएम ही संस्था आरोग्यमंत्री यांची स्वत:ची आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने घटनास्थळला भेट दिली. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चांगलीच खरडपट्टी देखील काढली. ही गॅस चोरीची घटना दिवस घडली असती तर केवढं नुकसान आणि हानी झाली असती याचा विचार न केलेला बरा, असेही सावंत म्हणाले. या भागात चालणारा हा काळा बाजार पोलिसांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचे सावंत म्हणाले आहेत.
ज्यावेळी पहिला स्फोट झाला त्यावेळी परिसरात असलेल्या सोसायटी हादरल्या होत्या. बसला आग लागल्याने त्याची भीषणता जाणवली होती. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिक रस्त्यावर आले होते. या परिसरात शाळा, कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हॉस्टेलही आहे. त्यामुळे विद्यार्थीही या स्फोटचा आवाज ऐकून बाहेर आले. त्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी देखील झाल्याचे पाहायला मिळाले.