अयोध्या : येत्या 22 जानेवारीला अयोध्यामध्ये श्रीरामप्रभुंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी संपूर्ण देश जय्यत तयारी करत आहे. 22 जानेवारी रोजी पुन्हा एकदा देशभरामध्ये दिवाळी साजरी केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभूंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. आजपर्यंत प्रभू श्रीरामांचे मंदिर केव्हा उभारले जाणार यासाठी प्रत्येक देशवासीय वाट पाहत होता. हे मंदिर आता पूर्णत्वास येत असून सर्वांना ओढ होती ती देखील आज काही अंशी पूर्ण होते आहे.
प्रभू श्रीरामांच्या अत्यंत लोभस अशा मूर्तीची पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. ही अत्यंत पवित्र मूर्ती साकारण्याचा मान प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांना मिळाला आहे. तर अरुण योगीराज यांनी देखील त्यांचे काम अत्यंत कौशल्याने चोख बजावले आहे. विशेष म्हणजे मैसूरच्या प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज देशातील प्रसिद्ध शिल्पकार आहेत. रामलल्लाची मूर्ती पाच वर्षांच्या मुलासारखी असावी, ज्यात देवत्वही प्रतिबिंबित व्हायला हवे असे देवस्थान समितीचे म्हणणे होते. रामचरित मानस आणि वाल्मिकी रामायणात उल्लेख केलेल्या श्रीरामाच्या प्रतिमेच्या आधारे ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. अरुण योगीराज गेल्या सात महिन्यांपासून सुमारे १२ तास या पुतळ्यासाठी काम करत होते.
16 जानेवारीपासूनच अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठीची तयारी सुरू झाली आहे. 18 जानेवारीला या मूर्तीची स्थापना गाभाऱ्यामध्ये करण्यात अली आहे. तर प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.