मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं सुरु आहेत. याच आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीये. या याचिकेमध्ये मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केल्याचं यावेळी निदर्शनास आलं. त्यातच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका करणारे मुख्य याचिकाकर्ते होते. त्यामुळे मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केल्याचं म्हटलं जात होतं.
हे वाचलेत का ? एक भाऊ मराठा-दुसरा कुणबी ? सख्ख्या भावांच्या दाखल्यावर वेगवेगळ्या नोंदी ! राज्यात असे प्रकार समोर येण्याची शक्यता
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 25 ऑक्टोबर पासून दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना देखील घडण्यास सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोनाविरोधात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात सदावर्ते यांनी यापूर्वीही याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होतं.
याआधी जेव्हा मराठा आरक्षणाचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा सदावर्तेंनी त्याला आव्हान दिलं. पण उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं. जे सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही. पण आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत असल्याचं चित्र आहे. याच आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे.