मुंबई : सध्या मराठा आरक्षण Maratha Reservation हा प्रमुख मुद्दा महाराष्ट्र सरकार समोर आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार ओबीसीतून सरसकट आरक्षण दिले जावे यावर राज्य सरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. आज मराठा आरक्षणासंदर्भातील या बैठकीमध्ये आतापर्यंत झालेल्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये मराठा आंदोलक जरांगे पाटील हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सामील झाले आहेत.
एकीकडे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण दिले जाईल अशी भूमिका राज्य सरकार घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर ओबीसीतूनच सरसकट मराठा आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील ठाम असून येत्या 20 जानेवारीला ते मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे हा मुद्दा सध्या महाराष्ट्र सरकार समोर पेच निर्माण करत आहे.
या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंडळ समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपसमिती सदस्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दिलीप वळसे पाटील, शंभुराज देसाई, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे, निवृत्त न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांच्यासह जरांगे पाटील हे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते.