मुंबई : आज एक मे महाराष्ट्र स्थापना दिन आहे. 65 व्या महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल आहे.मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मुख्य शासकीय समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना राज्यपालांनी आदरांजली अर्पण केली.
प्रमुख कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना राज्यपाल म्हणाले की, सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमी अग्रस्थानी राहिलेला आहे. सामाजिक समता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाकरिता आपले आयुष्य वेचणाऱ्या ध्येयवादी व्यक्तींचा महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या विविधतेतून संपूर्ण भारताचे दर्शन घडते. देशातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक आहे. राज्यात उच्च दर्जाची विद्यापीठे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संस्था आहेत. विलोभनीय विस्तीर्ण समुद्रकिनारे, पर्वत रांगा, वने, गड-किल्ले, नदी खोरे आणि पठारे अशा नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असलेला, जैवविविधतेने नटलेला महाराष्ट्र पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सर्वाधिक आवडीच्या ठिकाणांपैकी एक आहे.
तसेच राज्यपाल रमेश बैस म्हणाले कि, शेती, औद्योगिक उत्पादने, व्यापार, दळणवळण आदी क्षेत्रात देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक असलेला महाराष्ट्र देशाचे आर्थिक शक्तीकेंद्र असून देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्याच्या विकासात मुंबईसह पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी शहरांचे मोठे योगदान आहे.
संसदीय लोकशाहीमध्ये नियमितपणे होणाऱ्या निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी तसेच बळकट करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असतो. देशात सध्या लोकसभेसाठी निवडणुका सुरू आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन राज्यपाल बैस यांनी यावेळी केले. राज्यपालांच्या संदेशाच्या मराठी अनुवादाचे वाचन अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी केले.
याप्रसंगी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, मुंबई अग्निशमन दल ध्वज, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई पोलीस आणि मुंबई लोहमार्ग पोलीस ब्रास बॅण्ड पथक, राज्य राखीव पोलीस बलाचे पाईप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई पोलीस विभागाचे निर्भया वाहन पथक, मुंबई अग्निशमन दलाचे हाय राईज फायर फायटिंग वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव नितिन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध देशांचे उच्चायुक्त, महावाणिज्य दूतावासातील प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.