ओडिशा येथे नुकत्याच झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी बनवल्या गेलेल्या ‘कवच’ या यंत्रणेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली. अपघातग्रस्त रेल्वेमध्ये ही यंत्रणा अस्तित्वात असती तर हा अपघात टाळता आला असता का? इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू रोखता आला असता का? असे अनेक सवाल विचारले जात आहेत. ‘कवच’ यंत्रणा नेमकी काय आहे? ती कशी कार्य करते? याबाबत देखील अनेकांना प्रश्न पडले आहेत. (What is Kavach, How Kavach works)
भारतात रेल्वे अपघात टाळण्यासाठी “रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन” (RDSO) च्या माध्यमातून भारतीय रेल्वेने “ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP )सिस्टिम” तयार केली आहे. त्यालाच “कवच” असे म्हणतात.
ट्रेन कोलेजन अवोयडन्स सिस्टिम (TCAS) या अंतर्गत कवचची निर्मिती २०१२ मधे सुरु झाली होती आणि ती २०२२ मधे पूर्ण झाली. याची पहिल्यांदा चाचणी २०१६ मध्ये घेण्यात आली होती.
‘कवच’ला गांधीनगर ते मुंबईसाठी वंदे भारत २.० मध्ये लाँच करण्यात आले होते. या प्रणालीमध्ये 10,000 वर्षांमध्ये एखादा अपघात होण्याची शक्यता असल्याचा दावा केला जातो. म्हणजे या प्रणालीचा वापर असल्यास रेल्वे अपघाताची शक्यता जवळपास नाही असे समजू शकतो.
‘कवच’ यंत्रणा कशा प्रकारे कार्य करते ? (How Kavach in railways works)
या यंत्रणेच्या माध्यमातून दोन प्रकारच्या परिस्थितीत रेल्वे अपघात टाळता येऊ शकतो.
पहिली स्थिती म्हणजे, जेव्हा रेल्वे रेड सिग्नल चुकीने क्रॉस करते. यावेळी चालकाच्या जरी ते लक्षात आलं नाही तरी कवचच्या माध्यमातून रेल्वे स्वतः ते ओळखून थांबेल.
दुसरी स्थिति म्हणजे, जेव्हा दोन रेल्वे एकाच ट्रॅकवर समोरासमोर येऊन अपघात होण्याची शक्यता असेल. या परिस्थितीत मात्र दोन्ही रेल्वेमध्ये ‘कवच’ असणे गरजेच आहे.
ओडिशा येथील रेल्वे अपघात ‘कवच’ मुळे रोखता आला असता का ?
रेल्वे बोर्डाच्या सदस्या असलेल्या जया वर्मा सिन्हा यांनी ओडिशा रेल्वे दुर्घटनेवर स्पष्टीकरण देताना पत्रकार परिषदेत सांगितलं की, जास्त वेगाने जाणाऱ्या ट्रेनला अचानक अडथळा आला तर जगातील कोणतेही तंत्रज्ञान अपघात टाळू शकत नाही.
म्हणजे या रेल्वेमध्ये जर कवच असतं तरीही हि दुर्घटना टाळता आली नसती असा दावा करण्यात येत आहे. कारण कवचमुळे समोरासमोर येणाऱ्या रेल्वेची धडक रोखता येते. मात्र ओडिशा येथील अपघातात रेल्वे बाजूने येऊन धडकल्या आहेत.
या दुर्घटनेत पहिली ट्रेन मालगाडीला जाऊन धडकली व त्याचे काही डब्बे ट्रॅकवरून घसरून बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या रेल्वेला धडकले. दुसऱ्या ट्रेनचे शेवटचे डब्बे देखील रुळावरून घसरून हा अपघात झाला आहे.
‘कवच’ भारतात कूठे कुठे लावलेला आहे ?
या वर्षी मार्च महिन्यापर्यंत ७७ ट्रेन्स आणि १३५ स्थानकांमध्ये आणि १४६५ किलोमीटरवर कवच प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.
कवच प्रणाली ही सुरक्षेच्या बाबतीत SIL-4 या पातळीची असून कवच ही युरोपियन रेल्वे प्रणाली etcs-२ पेक्षा चांगली यंत्रणा असल्याचा दावा करण्यात येत आहे.
परदेशात कवच सारखी कोणती यंत्रणा कार्यरत आहे ?
भारता सारखीच परंतु प्रगत अशी युरोपिअन रेल्वे प्रणाली etcs म्हणून ओळखली जाते . या प्रणालीमध्ये सुरक्षेच्या क्वालिटीवरून वेगवेगळी पातळी असते . या प्रणालीवर अजून अभ्यास सुरु असून भविष्यातील स्वयंचलित ट्रेन ऑपरेशनसाठी हा पाया असणार आहे.