ISRO Mission Mars : भारताची अंतराळ संस्था असणारी इस्रो आता मंगळ ग्रहावर आणखी एक अंतराळ यान पाठवण्याची तयारी करत आहे. इस्रोने आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये मंगळ ग्रहाच्या कक्षेत एक अंतराळ यान यशस्वीपणे पाठवले होते. या यशस्वी मोहिमेनंतर आता नऊ वर्षांनी पुन्हा एका ‘मिशन मंगळ’ ची तयारी इस्रोने केली आहे. इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताचा दुसरा मार्स ऑर्बिटर मिशन-2 सोबत चार पेलोड घेऊन जाईल. मिळालेल्या माहितीनुसार मंगळयान-2 वरील उपकरणे मंगळ ग्रहाच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती घेऊन अभ्यास करतील.

त्यामध्ये आंतर ग्रहीय धूळ, मंगळ ग्रहाचं वातावरण आणि पर्यावरणाचा समावेश आहे. इस्रोमधील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, हे सर्व पेलोड विकासाच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. मंगळयान-2 च्या सुरू असलेल्या पूर्वतयारीनुसार दुसऱ्या मंगळ मोहिमेत एक मार्स ऑर्बिट डस्ट एक्सपेरिमेंट, एक रेडिओ ऑकल्टेशन प्रयोग, एक एनर्जेटिक आयन स्पेक्ट्रोमीटर आणि एक लँगमुइर प्रोब आणि इलेक्ट्रिक फिल्ड एक्सपिरिमेंटला सोबत घेऊन जाईल.