चीन : यावेळी 100 पार…. हे लक्ष्य घेऊन भारतीय खेळाडू चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई खेळ खेळण्यासाठी गेले होते. भारतीय खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत हे लक्ष्य पूर्ण केले आहे. सध्या 100 पदके जिंकली आहेत, मात्र ही संख्या आणखी वाढू शकते. एकूणच भारतीय खेळाडूंनी हांगझोऊमध्ये नवा इतिहास रचला आहे. यात 26 सुवर्ण, 29 रौप्य आणि 45 कांस्य पदकांचा समावेश आहे.
भारताच्या मुलींनी कबड्डीमध्ये सुवर्णपदक जिंकले, हे भारताचे 100 वे पदक होते. यावेळी भारताने जकार्ता आशियाई क्रीडा 2018 मध्ये 70 पदके जिंकण्याचा विक्रम मागे टाकला. 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण 70 पदके जिंकली होती. जकार्ता येथे भारताने 16 सुवर्ण, 23 रौप्य, 31 कांस्य अशी एकूण 70 पदके जिंकली होती.
1951 भारताची राजधानी दिल्ली येथे पहिल्या आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारताने 15 सुवर्ण, 16 रौप्य आणि 20 कांस्य जिंकली होती. 15 सुवर्णपदके जिंकणे ही त्यावेळी अप्रतिम कामगिरी होती, आशियाई क्रीडा स्पर्धेत 15 सुवर्णपदके जिंकण्याचा भारताचा विक्रम दीर्घकाळ अबाधित राहिला होता. भारताने एकामागून एक अनेक आशियाई खेळ खेळले, परंतु 15 सुवर्ण जिंकण्याचा विक्रम कायम राहिला.