मुंबई : महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या सीजनसाठी काल(मंगळवारी) खेळाडूंची लिलाव प्रक्रिया (MPL 2023 Auction) आयोजित करण्यात आली होती. या लिलावात नौशाद शेख हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. या पहिल्या सीजनमध्ये एकूण 6 फ्रँचायझी सहभागी होत आहेत. एमपीएलमुळे महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. एमपीएलमधून मिळणारा निधी हा क्रिकेटच्या प्रोत्साहनासाठीच वापरला जाणार आहे.
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२३ (MPL 2023)
राज्यात आयपीएलच्या धरतीवर एमपीएल लीग सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग (Maharashtra Premiere league) च्या पहिल्या हंगामासाठी, खेळाडूंची लिलाव प्रक्रिया काल पुण्यात आयोजित करण्यात आली होती.
डोमेस्टीक प्लेयर्ससाठी ही एक मोठी संधी आहे. एमपीएलचा पहिला हंगाम १५ ते २९ जून दरम्यान खेळवला जाणार आहे. या लिलावात महाराष्ट्र रणजी संघाचा खेळाडू नौशाद शेख याला विकत घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये मोठी स्पर्धा होती. कोल्हापूर टस्कर्सने नौशादला ६ लाख रुपयांमध्ये आपल्या संघाचा भाग बनवले.
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२३ च्या पहिल्या सीजनमध्ये एकूण 6 फ्रँचायझी सहभागी होत आहेत. या 6 फ्रँचायझींची नावे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या शिखर समितीने जाहीर केली.
MPL 2023 Teams
१. पुणेरी बाप्पा – सुहाना मसालेवाल्यांचा पुणेरी बाप्पा हा संघ आहे. या संघाचा आयकॉन प्लेयर ऋतुराज गायकवाड आहे.
२. कोल्हापूर टस्कर्स – कोल्हापूर टस्कर्स हा संघ पुनित बाल समुहाचा आहे. या संघाचा आयकॉन खेळाडू केदार जाधव आहे.
३. ईगल नाशिक टायटन्स – तिसरा संघ ईगल नाशिक टायटन्स आहे. ईगल इन्फ्रा इंडियाचा हा संघ आहे. या संघाचा आयकॉन खेळाडू राहुल त्रिपाठी आहे.
४. छत्रपती संभाजी किंग्ज – वेंकटेश्वरा इंडस्ट्रिजचा संघ छत्रपती संभाजी किंग्ज असून राजवर्धन हुंगरगेकर या संघाचा आयकॉन खेळाडू आहे.
५. रत्नागिरी जेट्स – जेटस सिंथेसिसचा संघ रत्नागिरी जेट्स आहे, ज्याचा आयकॉन खेळाडू अझीम काझी आहे.
६. सोलापूर रॉयल्स – सोलापूर रॉयल्स हा कपिल सन्सचा संघ आहे. सहावा संघ सोलापूर रॉयल्स आहे, ज्याचा आयकॉन खेळाडू विकी ओस्तवाल आहे. पहिल्या सीजनमधील सर्व सामने गहुंजे स्टेडियमवर आयोजित केले जातील. त्याचबरोबर महिला संघांचे ३ प्रदर्शनीय सामनेही हंगामाच्या मध्यावर आयोजित केले जातील.
३०० हून अधिक खेळाडूंचा लिलाव प्रक्रियेत समावेश
एमपीएलच्या पहिल्या हंगामासाठी ३०० हून अधिक खेळाडूंचा लिलाव प्रक्रियेत समावेश करण्यात आला होता. यामध्ये रणजी खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बेस प्राइस ६० हजार रुपये होती. १९ वर्षांखालील आणि ‘ब’ गटातील खेळाडूंसाठी ४०,००० रुपये तर ‘क’ गटातील खेळाडूंसाठी २०,००० बेस प्राइस देण्यात आली होती. सर्व ६ फ्रँचायझींना २० लाख रुपये पर्स मनी देण्यात आले होते. त्यामध्ये ते त्यांच्या संघात जास्तीत जास्त १६ खेळाडूंचा समावेश करू शकत होते आणि यात २ अंडर-१९ खेळाडू असणे अनिवार्य होते.
नौशाद शेखची कामगिरी
३१ वर्षीय नौशाद शेखबद्दल बोलायचे झाले तर, तो आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये ४५ टी-२० सामने खेळला आहे. नौशाद हा ऑफ-स्पिन गोलंदाज असून त्याने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये १८.५८ च्या सरासरीने १२ बळी घेतले आहेत.