दिवाळीची सुरूवात ही वसूबारसच्या सणाने होते. यंदा वसूबारस ही ९ नोव्हेंबरला म्हणजेच आज आहे. वसूबारसच्या दिवशी गाय-वासराची पूजा केली जाते. त्यांची पूजा करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. आश्विन कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी वसूबारस आहे. आज वसूबारस आणि रमा एकादशी देखील आहे.
अशाप्रकारे करा वसूबारसची पूजा ?
लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे या हेतूने वसूबारसच्या दिवशी गाय-वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. सायंकाळी गाय-वासराची पूजा करताना घरातील सूवासिनी गाय-वासराच्या पायांवर पाणी घालतात, हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. गाय-वासराला कुंकू-हळद आणि अक्षदा वाहिल्यानंतर त्यांना निरांजनाने ओवाळले जाते. त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो गाय-वासराला खायला दिला जातो.
आजच्या दिवशी रांगोळी आणि दिव्यांची सजावट केली जाते. दिवाळीचा पहिला दिवा आजच्या दिवशी लावला जातो. तसेच या दिवशी उडदाचे वडे, भात आणि गोडाधोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात. हे पदार्थ गाय-वासराला खाऊ घातले जातात. हा सण सगळीकडे अगदी उत्साहाने साजरा केला जातो आणि दिवाळीची दणक्यात सुरूवात केली जाते.