पंढरपूर : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.राज्यभरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय.शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं पहिल्या माळेला विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला ठेवणीतील मौल्यवान अलंकारांनी सजविण्यात आलं. विठ्ठल रुक्मिणीचं हे हिरेजडित रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केलेली.
विठ्ठलाला मस्तकी सोन्याचा मुकुट, कंठी कौस्तुभ मणी, हिऱ्याची कंगन, मोत्याचा हार, शिरपेच, मत्स्य जोड, मोत्याची कंठी, सोन्याची तुळशीमाळ अशा जवळपास 21 प्रकारच्या ठेवणीतील अलंकारांनी सजविण्यात आलं.अलंकार आभूषणांनी सजलेलं माऊलीचं गोजिरं रूप पाहून भाविक आनंदी होत होते.
रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, हिरेजडित वाक्या तोडे, तानवड जोड, हिरेजडित जवेंच्या माळा, चिंचपेटी, लक्ष्मी हार, मोहराची माळ, पुतळ्याची माळ, सरी, हायकोल असे 15 प्रकारचे अत्यंत मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आलेले.ठेवणीतील अनमोल दागिन्यात विठुराया आणि रुक्मिणी मातेचं अतिशय मनमोहक रूप भक्तांना पाहायला मिळालं.नवरात्रीनिमित्त पंढरपुरात मोठी गर्दी पाहायला मिळतेय.